कृषी विधेयकाविरोधात १ ऑक्टोबरपासून पंजाबचे शेतकरी देशव्यापी ”रेल रोको” करणार

अमृतसर(पंजाब), २८ सप्टेंबर २०२०: मोदी सरकारनं तीन कृषी विधेयकं संसदेत मांडून ती दोन्ही सभागृहात पास करून घेतली. त्यानंतर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करत विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले. मात्र या तीनही विधेयकांना शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून पंजाबमधील शेतकरी देशव्यापी ”रेल रोको आंदोलन” करणार आहेत.

मोदी सरकारच्या या विधेयकाला देशभरातले शेतकरी विरोध करत आहेत. पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये हा विरोध तीव्र झाल्यामुळे शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापरही करण्यात आला होता. मात्र तरीही य शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांना आपला विरोध कायम ठेवला आहे. आज क्रांतिकारी शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिम्मित अमृतसरमधील शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅकवर बसून मेणबत्त्या पेटवत या कृषी बिलाला विरोध केला आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीचे सरवनसिंग पंढर म्हणाले, “रेल्वे रोको आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन केले जाईल.” दरम्यान कृषी विधयेक हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे, हे पटवून देण्यासाठी खुद्द नरेंद्र मोदींनी दोनवेळा जनतेला संबोधीत केलं. मात्र अजूनही शेतकऱ्यांचा सरकारवर अविश्वास कायम आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा