शिरपूर, ३० सप्टेंबर २०२०: खान्देशातील प्रसिद्ध उद्योगपती तपन पटेल यांचं अपघाती निधन झालंय. तपन मुकेशभाई पटेल धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे नगरसेवक होते. शिरपूर जवळील टोल नाक्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचं निधन झालं. ते ३९ वर्षांचे होते.
पटेल बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. ते शिरपूर निम्स कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच १८ एएक्स ८) च्या इंजिनचा स्फोट झाला. अपघातात त्यांच्या गाडीचाही चक्काचूर झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेनं त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतांना काही वेळातच त्यांचं निधन झालं.
राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र तर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे