नवी दिल्ली ३ ऑक्टोबर,२०२० :गेल्या तीन-चार दिवसांपासून हाथरस येथील प्रकरण पेट घेत आहे. तेथील पीडितेवर अत्याचार झाला, त्यानंतर १५ दिवस पोलिसांनी सदर घटनेची दखल घेतली नाही. २९ सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना एका खोलीमध्ये डांबून ठेवून पीडितेवर पोलिसांनी मध्यरात्री अंत्यसंस्कार केले.हाथरस येथे गेले तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पत्रकारांना पीडितेच्या कुटुंबीयां पर्यंत पोहोचू दिले जात नाहीये. काँग्रेसचे राहुल गांधी तिथे पोहोचले असता त्यांनादेखील थांबवण्यात आले व पोलिसांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. याचे पडसाद उत्तर प्रदेश व महाराष्ट्रासह इतर राज्यांतही दिसले.
परंतु आता या पिडीतेच्या बाजूने लढण्याकरीता व तिला न्याय मिळवून देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू हे पुढे आले आहेत. राजरत्न आंबेडकर हे हाथरस येथील पीडीतेकरीता न्यायालयात दाद मागणार आहेत.
राजरत्न आंबेडकर हे स्वतः तेथील कलेक्टरना भेटले, त्याचबरोबर पोलिस अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी बातचीत केली. व मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची प्रत व शवविच्छेदनाचा अहवालाची प्रत देखील ते घेऊन आले. सद्य परिस्थितीत पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौज फाटा तैनात आहे, व पोलिसांच्या दबावाखाली अथवा गावकरी आपला जीव घेतील या भीतीने पीडितेचे कुटुंबीय न्यायालयात दाद मागणार नाहीत. परंतु मी स्वतः पीडितेला न्याय मिळवून देण्याकरिता न्यायालयात अपील करणार आहे. असे राजरत्न आंबेडकर म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे