पुरंदर, दि. ४ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड नजिक दिवे घाटाच्या जवळ असलेल्या हॉटेल व्हिक्टोरिया इंन इव्हीनिंग वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद पथकाने कारवाई करीत ३० लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुगार आड्डा चालवणारंचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवे घाटातील झेंडेवडीतील माऊली विसाव्या शेजारील व्हि. के. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पेट्रोलिंग असलेल्या पथकाला कळली. यानंतर याबाबतची माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली व मदतीसाठी बोलावण्यात आले. यानंतर हे सर्वजण काल(दि.३)सायंकाळी पावणे सहा वाजता या हॉटेलच्या दरवाज्यात गेले. तत्पूर्वी पोलिसांनी संपूर्ण हॉटेल परिसराला वेढा घातला होता. हॉटेलच्या दारात या हॉटेलचे मालक हे आढळून आले. त्यांना घेऊन पथक हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. त्याठिकाणी काही लोक जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांना त्यांना जागेवरच रंगे हात पकडले.
याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल व्हिक्टोरिया इंन इव्हीनिंगचे मालक विजय बाबु कोल्हापुरे यांचेवर जुगार आड्डा चालवणे व पैसे घेऊन जुगार आड्डा चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या प्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलीस जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४:५:१२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार दहशदवाद पथकाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शेवाळे यांनी दाखल केली आहे. या कारवाई मध्ये सहा.पो.नि.राजेंद्र मोहीते,सहा.फौ.सुनिल ढगारे,पो.ह.राजेंद्र मिरगे,पो.ना.ईश्वर जाधव,विशाल भोरडे, किरण कुसाळकर,महेंद्र कोरली,मोशिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार, चालक फौजदार विश्र्वास खरात यांसह सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके पोलीस कर्मचारी राजेश पोळ, भरत आरडे, अजित माने, ज्योतिबा भोसले,महेश उगले, आर.बी. कोल्हे, यादव यांनी सहभाग घेतला.
जिल्हातील ही मोठी कारवाई
पुणे जिल्हा ग्रामीणचे एस.पी. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना ईशारा दिला होता. यानंतर आता पुरंदर तालुक्यात जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार आहे. गुन्हेगारीचे मूळ असलेल्या जुगार, मटका व अवैध दारू विक्री यावरच कारवाई केल्यामुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसणार आहे. स्थानिक पोलिसांच्या नाकावर टीच्चून दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्याने व मोठी कारवाई झाल्याने आता या प्रकारच्या गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानंवर सुद्धा आता वचक निर्माण होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: