आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको; पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

इंदापूर, ४ ऑक्टोबर २०२०: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी आरक्षणाची प्रखर मागणी केली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली.

एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणातील सवलतीला न्यायालयाने दिलेली स्थगिती त्वरीत उठवावी, तसेच राज्य शासनाने सध्या चालू केलेली सर्वच नोकरभरती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवावी. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, कै.श्री.आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळास १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. राज्य लोकसेवा आयोगसने एस.ई.बी.सी. प्रवर्गाच्या ज्या निवडी केलेल्या होत्या त्या संरक्षित करण्यात याव्यात. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशाबाबतच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी शासनाने शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांची नियुक्ती करुन त्या त्वरीत सोडवाव्यात अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.

मराठा समाजाने कष्टाने मिळवलेले आरक्षण हे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवू शकले नसल्याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या नावाने निवेदन देण्यात आले असून या मागण्यांचे निवेदन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मंडल अधिकारी मकरंद तांबडे यांनी स्वीकारले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा