कर्नाटक, ५ ऑक्टोंबर २०२०: भष्ट्राचाराच्या आरोपांशी संबंधीत एका प्रकरणात केंद्रीय तपास संस्था असलेल्या सीबीआय’नं आज काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरांवर छापे टाकले. या १४ ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये आतापर्यंत ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहेत. याचवेळी डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या काही ठिकाणांवरदेखील छापे मारण्यात आले आहेत.
सीबीआयच्या पथकांनी बंगळुरूतील सदाशिवनगरमधील डी.के. शिवकुमार यांच्या, तर खासदार डी.के. सुरेश यांच्या कनकपुरा आणि बंगळुरूमधील मालमत्तांवर छापे टाकले. बंगळुरुसह इतर काही ठिकाणांवर ही छापेमारी अजूनही सुरु आहे. यामध्ये कर्नाटकमधील ९, दिल्लीतील ४ आणि मुंबईतील एका ठिकाणाचा समावेश आहे. सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्त्वाखालील पथकांनी सकाळी सहा वाजता धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईसंदर्भात सीबीआय’नं रविवारी सायंकाळीच विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली होती.
या कारवाईनंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षानं नेहमीच सुडाचं राजकारण केल्याचं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘भाजप नेहमीच सूडाचं राजकारण करत जनतेचं लक्ष मूळ मुद्द्यांवरुन भरकटविण्याचा प्रयत्न करतेय. डीके शिवकुमार यांच्या घरावर टाकण्यात आलेली धाड हा अशाच प्रकारचा प्रयत्न आहे.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे