नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२०: कोविड संसर्गावर मात करण्यात भारतानं उल्लेखनीय टप्पा ओलांडलाय. राष्ट्रीय रोगमुक्ती दर आज ८५ टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या काही आठवड्यांमध्ये रोगमुक्त होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा नव्यानं बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलंय.
देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ८२,२०३ व्यक्ती रोगमुक्त झाल्या असून नवीन बाधित रुग्णांची संख्या ७२,०४९ इतकी आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गातून ५७,४४,६९३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं जागतिक पातळीवर सर्वात जास्त रोगमुक्त झालेल्यांच्या यादीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे.
रोगमुक्तीची पातळी सतत जास्त राखल्यामुळं देशात सक्रीय रुग्ण आणि रोगमुक्त व्यक्ती यांच्या संख्येतील तफावत सतत वाढताना दिसत आहे. सध्या सक्रीय असलेल्या ९,०७,८८३ रुग्णांच्या तुलनेत रोगमुक्त झालेल्यांची संख्या ४८,३६,८१० म्हणजे ४८ लाखांनी जास्त आहे. रोगमुक्तांची संख्या सक्रीय रुग्णांच्या ६.३२ पट आहे. यावरून देशात संसर्ग मुक्त होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे हे सुनिश्चित झालं आहे.
सध्या सक्रीय असणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या फक्त १३.४४ टक्के आहे आणि हा दर सतत कमी होताना दिसत आहे. रोगमुक्तीचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमाण लक्षात घेतले तर १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता रोगमुक्तीचा दर उर्वरित देशातील दरापेक्षा जास्त नोंदला आहे.
देशातील नव्यानं रोगमुक्त झालेल्यांपैकी ७५ टक्के व्यक्ती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधील आहेत. तसेच एका दिवसात रोगमुक्त होणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून तिथे सर्वात जास्त म्हणजे १७,००० व्यक्ती रोगमुक्त झाल्या आहेत, तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर असून तिथं १०,००० व्यक्ती रोगमुक्त झाल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे