पुणे, ७ ऑक्टोंबर २०२०: यंदाच्या पावसानं राज्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. मागच्या वर्षीप्रमाणं या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळं पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. राज्यातील सर्वच भागात यावर्षी पावसानं हजेरी लावली. विशेष म्हणजे मराठवाडा जो कमी पावसासाठी ओळखला जातो तिथं देखील नद्यांना पूर आला. पिण्याच्या पाण्याची पूर्ण व्यवस्था झाली असली तरी यंदाच्या पावसानं पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. सध्या पाऊस गेला असला तरी आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीय.
मंगळवारी मान्सूननं उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मान्सूननं पश्चिम राजस्थानामधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगानं पुढं जात असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज्यातून देखील मान्सूनच्या परतीची वाटचाल सुरू होईल असं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे. ही सर्व परिस्थिती पाहता राज्यातील वेगवेगळ्या भागात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
या ठिकाणी पडेल पाऊस
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्यामुळं या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. डोंगराळ पट्ट्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे