राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना “क्लिनचिट”

10

बारामती, ८ ऑक्टोबर २०२०: राज्य शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट मिळाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या प्रकरणी अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चीट मिळाली आहे.

बहुचर्चित महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला होता. शिखर बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात होता याप्रकरणी अजित पवार यांच्या अडचणीत त्यावेळी वाढ झाली होती पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे सुरिंदर अरोरा यांनी याप्रकरणी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला होता. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप होता.

हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले होते. घोटाळ्याच्या काळातील सर्व मंत्री बँकेचे अधिकारी होते. त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत. अशा एकूण ३०० च्या वर मंत्री आणि अधिकार्‍यांची नावे याप्रकरणात आहेत. या प्रकरणात शिखर बँकेच्या संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करून नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा, गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूत गिरण्यांना ६० कोटींचे कर्ज, केन ऍग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा, २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५ कोटींची थकबाकी, २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित, लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान, कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८ कोटींची थकबाकी, खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान, ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६ .१२ कोटींचा तोटा असे आरोप करण्यात आले होते.

या निकालानंतर आज बारामतीत जल्लोष करण्यात आला, अजितदादा हे रोख-ठोक बोलणारे सच्चे नेते आहेत. भ्रष्टाचार बाहेर काढणारे आहेत. भ्रष्टाचार करणारे नाहीत. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी जल्लोषात क्लीन चीटचा आनंद व्यक्त केला.

न्युज अनकट – अमोल यादव