मुंबई, ९ ऑक्टोंबर २०२०: माजी राज्यपाल, केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक आणि हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक अश्विनी कुमार यांनी बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे २००८ ते २०१० या काळात ते केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक पदी ते होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. यावर भाष्य करत शिवसेनेचे खासदार व सामना’चे संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न आणि शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार का मरण पावले ?, हे रहस्य राहू नये. शिमल्याचे पोलीस तपास करतीलच. पण सी.बी.आय.चे नेतृत्व केलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येनं सी.बी.आय.ने तरी पापण्यांची उघडझाप करावी.’
संजय राऊत म्हणाले की, “आपल्या देशात नक्की काय चाललं आहे तेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली असं वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले? हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरं!”
‘सामना’च्या माध्यमातून टोला लावत संजय राऊत पुढं म्हणाले की, “सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केली आहे. देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा प्रश्नी गढूळ झालं असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्यानं ग्रासते, जगण्यासारखे काही उरलं नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही,”
कंगनावर ही टीका
“अश्विनीकुमार हे फक्त सी.बी.आय.चेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालँड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱ्या एसपीजी गटात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनानं, शरीराने खंबीर होते. त्यामुळंच त्यांच्यावर सरकारनं विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’नं भाष्य केले पाहिजे,”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे