रायगड, ९ ऑक्टोबर २०२०: आजकाल भारतात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रोज कुठे ना कुठे बलात्कार झाल्याची बातमी ऐकू येते. रोहा पाठोपाठ आता पालीमध्येही बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पाली येथील प्रकार हा खूप धक्कादायक आहे, चक्क ठेकेदारानेच आपल्या येथे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणात पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन ठेकेदाराला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार आणि एट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाली तालुक्यातील १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही गावातील नितीन महादू पाटील या ठेकेदाराकडे मजुरीचे काम करत होती. १ जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२० या दरम्यान पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत व पालघर तालुक्यातील डहाणू येथील चरी गावठाण या ठिकाणी तिला नेऊन तिच्यावर अत्याचार केले, तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक अपशब्द वापरले.
या सर्व प्रकरणाबाबत अल्पवयीन मुलीने गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी पोलिस स्थानकात ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी ठेकेदारावर अट्रोसिटीचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत. तसेच सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. हे गुन्हे केव्हा थांबणार केव्हा महिलांवरील अत्याचार बंद होणार.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे