मुंबई, ११ ऑक्टोंबर २०२०: बनावट टीआरपी प्रकरणानंतर रिपब्लिक टीव्ही चॅनेलचा सर्व सावळा कारभार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीचा फास देखील आता रिपब्लिक टीवी भोवती आवळत चालला आहे. यासंदर्भात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना नवीन समन बजावण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी आणि प्रिया मुखर्जी यांची नावंही यात समाविष्ट आहेत.
दुसरी समन्स रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांना पाठविण्यात आली आहे. याशिवाय हंसा रिसर्च’च्या सीईओ यांनाही समन्स बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आयकर आणि जीएसटी विभागाला कळविलं आहे.
पोलिसांनी आयपीजी मीडियावर्क्स’चे शशी सिन्हा आणि मॅडिसन’चे सॅम बलसारा यांचे जबाब नोंदवले आहेत. दोघांनाही जाहिरातदारांबद्दल विचारलं गेलं. रिपब्लिक टीव्हीद्वारा चालवलेला अहवाल हा हंसा रिसर्चचा अंतर्गत अहवाल नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं. अशा कोणत्याही अहवालाची त्यांना माहिती नाही जो अहवाल रिपब्लिक टीव्हीनं दाखवला आहे. तपास अधिकारी सचिन वाजे यांच्यानुसार आरोपी बोंपल्ली राव मिस्त्री यांना पाच ते सहा खात्यांमधून पैसे मिळाले होते. एक कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे व्यवहार सापडले. ३८ अशा लोकांची विधानं नोंदविली गेली आहेत ज्यांच्या घरात बॅरोमीटर बसविण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी गुरुवारी फॉल्स टेलिव्हिजनच्या टीआरपी रॅकेटचा सर्व सावळा कारभार उघडकीस आणल्याचा दावा केला होता. रिपब्लिक टीव्हीसह ३ चॅनेल पैसे देऊन टीआरपी खरेदी करतात असे पोलिसांनी सांगितले. या वाहिन्यांचा तपास सुरू आहे. टीआरपीच्या बनावट प्रकरणाविषयी काही लोकांना अटकही करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे