कर्मयोगी कारखाना यंदाच्या हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार: हर्षवर्धन पाटील

7

बिजवडी (इंदापूर), ११ ऑक्टोंबर २०२०: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी (ता.इंदापूर) चा  हंगाम २०२०-२१ चा ३१ वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पुजन समारंभ रविवारी (दि.११) रोजी विधीवत पुजेसह महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन पद्मा भोसले यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

या गळीत हंगामामध्ये कारखान्यानं १४ लाख मेट्रिक टन गाळप करणेचं उद्दिष्ट ठेवलेलं असून त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंञणा कारखाना कार्यक्षेञामध्ये हजर झालेली आहे. तसेच या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन १ कोटी ३० लाख ब.लि., सहवीज निर्मिती ३ कोटी युनिटस, बायोगॅस १२ लाख घनमीटर, सेंद्रीय खत ४ लाख बॅग, कंपोष्ट खत २४ हजार मे.टन व जैविक खते/औषधे २० हजार लिटर एवढं उत्पादन पूर्ण करणेचं उदिदष्ठ कारखान्यानं या हंगामामध्ये ठेवलेलं आहे.
 
मागील वर्षीच्या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाची उर्वरीत एफ.आर.पी.ची रक्कम लवकरंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत अशी ग्वाही हर्षवर्धनजी पाटील यांनी यावेळी दिली. तसेच चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसास आजूबाजूच्या कारखान्याच्या बरोबरीनं ऊसाला दर दिला जाईल व दर पंधरवाडयाला ऊसाची बीलं व ऊस तोडणी वाहतुकदारांची बीलं संबंधित सभासदांच्या व वाहतुकदारांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत असंही यावेळी हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगितलं. 

यावर्षी आपल्या कार्यक्षेञामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे, त्यामुळं कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांच्या सहकार्यानं कार्यक्षेञामधील संपुर्ण ऊसाचे गाळप करुन हा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस व्यक्त केला.

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक  भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड,  राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.   

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे