पर्वती, पद्मावती विभागात वीजपुरवठा सुरळीत ; चक्राकार भारनियमन टाळले

पुणे, दि. १२ , आॉक्टोबर २०२०: आज महापारेषणच्या नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आल्यानंतर महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दुपारनंतर चक्राकार भारनियमन टाळण्याची कामगिरी केली.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला होता.

त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. ४ या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला होता. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील ८२ वीजवाहिन्यांवर चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन सुरु करण्यात आले होते.

परंतु, महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी तसेच चक्राकार भारनियमन टाळून पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले.

यामध्ये तांत्रिक उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा