इस्लामाबाद, १३ ऑक्टोंबर २०२०: फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या बैठकीच्या काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसलाय. पाकिस्ताननं सावकारी आणि दहशतवादी वित्तपुरवठा विरोधात उचललेले उपाय पुरेसे नाहीत हे लक्षात घेऊन एफएटीएफ’च्या प्रादेशिक युनिटनं पाकिस्तानला ‘वर्धित पाठपुरावा (Enhanced Follow-Up)’ यादीमध्ये कायम ठेवलं आहे. पॅरिसमधील एफएटीएफची बैठक २१-२३ ऑक्टोबरला होणार आहे.
डॉन’च्या अहवालानुसार आशिया-पॅसिफिक ग्रुप’ला (एपीजी) असं आढळलं की दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा आणि मनी लॉन्ड्रिंग यावर नियंत्रण आणण्यासाठी एफएटीएफ कडून घालून दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यास पाकिस्तान असमर्थ ठरला आहे. एपीजी’नं म्हटलं आहे की एफएटीएफ’नं केलेल्या ४० पैकी केवळ दोन शिफारसींवरच पाकिस्ताननं प्रगती केली आहे. हे पाहता एपीजी’नं जाहीर केलं आहे की पाकिस्तान ‘वर्धित पाठपुरावा (Enhanced Follow-Up)’ यादीमध्ये राहील. त्याचबरोबर पाकिस्तानला ४० सूचना अंमलात आणण्याच्या प्रयत्नांची माहिती द्यावी लागंल.
पाकिस्तानला एफएटीएफ देखरेख यादी म्हणजे ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याबाबतचा निर्णय या महिन्यात येईल. जून २०१८ पासून पाकिस्तान वॉच लिस्टवर आहे. पॅरिसमधील आंतर-सरकारी संस्था एफएटीएफ’नं पाकिस्तानला मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी निधी रोखण्यासाठी २०१९ पर्यंत योजना लागू करण्यास सांगितलं होतं. साथीच्या आजारामुळं ही वेळ मर्यादा वाढविण्यात आलीय. आर्थिक परिस्थितीशी झगडत असलेल्या पाकिस्ताननं गेल्या आठ ऑगस्टमध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद, जैश-ए-मुहम्मद मास्टर मसूद अझर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह ८८ दहशतवादी संघटनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर बंदी घातली होती.
मनी लाँडरिंग आणि दहशतवादी निधी रोखण्यासाठी एफएटीएफ’नं इस्लामाबादला २७ कार्य बिंदूंवर काम करण्याचं लक्ष्य सोपवलं होतं, परंतु त्यापैकी १३ कार्य बिंदूंना ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यानंतर, गेल्या फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला आणखी चार महिने देण्यात आले. एफएटीएफ’च्या ग्रे लिस्ट मध्ये टाकल्यामुळं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून पाठिंबा मिळविण्यात अडचणी येत आहेत. पाकिस्तान आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करीत असून या संस्थांकडून त्यांना आर्थिक मदत हवी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे