शरद पवार मराठवाड्याच्या दौर्‍यावर, ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

उस्मानाबाद, १८ ऑक्टोबर २०२०: अचानक बदललेल्या हवामानामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. फळभाज्या पासून ते कापूस कांदा यांसारख्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. याचाच आढावा घेण्यासाठी शरद पवार आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर निघाले आहेत. याची सुरुवात त्यांनी तुळजापूर पासून केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत.

शरद पवार आपल्या दौऱ्यासाठी निघाले असता कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान त्यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. हा दौरा करत असताना लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी देखील पावसामुळं पिकांचे नुकसान झालं होतं. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना हवी तेवढी नुकसान भरपाई मिळालेली नाही. हे लक्षात घेत तेथील शेतकऱ्यांनी पावसामुळं खराब झालेली आपली पीकं हातात घेत शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळं ती वाया गेली. त्यामुळं आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असं शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितलं. चौकशीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या झालेल्या नुकसानीची व्यवस्थित माहिती द्या अशा सूचना देखील शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या.

यंदा मराठवाड्यात चांगलाच मुसळधार पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील उमरगा आणि लोहारा या तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथल्या स्थानिकांचे देखील हेच म्हणणे आहे की गेल्या १३ वर्षांत एवढा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचं निदर्शनास आलं नव्हतं. या वर्षी झालेल्या या मुसळधार पावसामुळं सहाजिकच तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान देखील झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकून घेत आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांनाही शासनाकडून आपल्याला लवकरात लवकर मदत मिळेल, अशी आशा वाटत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा