बलिया गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंग’ला अटक

बलिया, १८ ऑक्टोंबर २०२०: बलिया गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंग याला अटक करण्यात आली आहे. गेले तीन दिवस तो फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार एसटीएफच्या पथकांनी आज सकाळी लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क येथून बलिया प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगला पकडले.

धीरेंद्र सिंगशिवाय अन्य दोन संशयित आरोपी संतोष यादव आणि अमरजित यादव यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर ५०-५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यासह मुख्य आरोपी धीरेंद्र सिंग सोडून आतापर्यंत एकूण १० (५ ओळख पटलेले, ५ इतर) आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफची टीम मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगला बलिया येथे नेईल आणि स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह आत्मसमर्पण करण्याच्या विचारात होता. दरम्यान, तो उत्तर प्रदेशमधील अनेक नेते आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. वकिलांशी संपर्क साधून शरण जाण्याची इच्छा होती. म्हणूनच दोन दिवसांपूर्वी तो लखनौमध्ये होता. सरेंडरची संपूर्ण योजना तयार केली गेली होती, परंतु ऐन वेळी एसटीएफने त्याला पकडले.

एसटीएफचे आयजी अमिताभ यश यांनी सांगितले की, धीरेंद्र सिंग आणि त्याच्या साथीदारांना आज लखनऊहून अटक करण्यात आली. तिघांकडे अज्ञात ठिकाणी चौकशी केली जात आहे. धीरेंद्रच्या साथीदारांकडील शस्त्रेही जप्त केली आहेत. घटनेच्या वेळी वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची अधिक माहिती एसटीएफ गोळा करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा