नाशिक, १९ ऑक्टोबर २०२०: नाशिक मध्ये जेव्हा मनसेची सत्ता होती त्यावेळेस मनसेने साकारलेल्या ड्रीम प्रोजेक्ट बोटॅनिकल गार्डनची सध्या दुरवस्था झाली आहे. नाशिकमधील हे बोटॅनिकल गार्डन सध्या टवाळकी व टाइमपास करण्यासाठीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे मनसे संतापली असून जर त्वरित यावर कारवाई केली गेली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणी देखील देण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना सामाजिक दायित्व निधीतून म्हणजेच सीएसआर निधीमधून राज ठाकरे यांनी नाशिक मध्ये मोठे प्रकल्प आणले होते. या मोठ्या प्रकल्पांपैकी मनसेसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रोजेक्ट म्हणजे पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पंडित नेहरू वन उद्यानातील बोटॅनिकल गार्डन होय. महत्त्वाचं म्हणजे टाटा कंपनीनेच या प्रकल्पासाठी २० कोटींचा निधी दिला होता. टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या हस्तेच २०१६ मध्ये याचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं होतं.
अत्यंत दुर्मिळ वनौषधी, बसण्यासाठी सुंदर निसर्गरम्य सिट आउट्स, जंगली प्राण्यांचे हुबेहुब दिसणाऱ्या प्रतिकृती, फळ, फुल, औषधी, जंगली प्राणी यांची सखोल माहिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांचं आत्मचरित्र सांगणारा एक लेझर शो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्गाची ओळख करुन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनची सध्या मात्र दुरावस्था झाली आहे.
परिसरातील टवाळखोरांमुळे याठिकाणी काम करणारे सुरक्षारक्षकच आता भितीच्या छायेत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत असताना, मनसेच्या काळात उभारलेल्या या कामांकडे सत्ताधारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप मनसेने केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे