मध्य प्रदेशात, २० ऑक्टोबर २०२०: मध्य प्रदेशात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या एका महिला नेत्यावर अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली होती. कमलनाथ यांनी महिला नेत्याला आईटम म्हणून संबोधलं होतं. असं असतानाच आता मध्य प्रदेशमधील भाजप नेते बिसाऊ लाल साहू यांनी काँग्रेस नेते विश्वनाथ सिंह यांच्या पत्नीसाठी अपशब्द वापरला आहे.
मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीपूर्वी अनुपपूरमधील भाजपचे उमेदवार बिसाऊ लाल साहूचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये बिसाऊ लाल साहू असं म्हणतात की विश्वनाथ सिंह यांनी निवडणूक फॉर्ममध्ये आपल्या पहिल्या पत्नीचा तपशील दिलेला नाही तर दुसर्या महिलेचा तपशील दिला आहे. या दरम्यान, बिसाऊ लाल साहू अपशब्द वापरतात.
त्याचबरोबर काँग्रेस नेते विश्वनाथ सिंह यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की ते (बिसाहु लाल साहू) अप्रासंगिक गोष्टी बोलत आहेत कारण ते निवडणुका हरत आहेत. मी १५ वर्षांपूर्वी माझ्या पत्नीशी लग्न केलं आणि आम्हाला दोन मुलं आहेत. मी त्याच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल करंल.
कमलनाथ यांच्या विधानावरून वाद
त्याचबरोबर मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी रॅलीत भाजपच्या नेत्या इम्रती देवी यांना आईटम म्हणून संबोधलं होतं, यावरुन राजकीय गदारोळ तीव्र झाला आहे. या विधानाचा निषेध म्हणून शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी दोन तास मौन उपोषण केलं आणि काँग्रेसला माफी मागण्याचं आवाहन केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे