इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी स्वातीताई शेंडे; भाजपचे वर्चस्व कायम

इंदापूर, २० ऑक्टोबर २०२०: इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज मंगळवारी (दि.20) झालेल्या निवडणुकीत काटी गणातील सदस्या स्वाती बापूराव शेंडे (रा.वरकुटे खुर्द) बहुमताने निवडून आल्या. त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.

पं.स.च्या विद्यमान सभापती पुष्पा रेडके यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी सत्तारूढ बाजूकडून सभापती पदासाठी स्वाती शेंडे यांनी तर विरोधी राष्ट्रवादीकडून शेटफळगढे गणाच्या सदस्या शीतल वनवे यांनी उमेदवारी अर्ज केला. यावेळी झालेल्या मतदानात स्वातीताई शेंडे यांना 8 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल वनवे यांना 5 मते मिळाल्याने सभापतीपदी स्वातीताई शेंडे यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सभापती पुष्पा रेडके यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला व त्यांचा कामाचे कौतुक केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘माजी सभापती पुष्पा रेडके यांनी चांगले काम केले, कोरोना काळात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांनी सामान्य माणसाच्या हिताचे काम करावे.

नूतन सभापती स्वाती शेंडे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लोकांना पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर राहू, असे सांगितले.

याप्रसंगी माजी सभापती करणसिह घोलप व सदस्य हेमंत नरूटे यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक अधिकारी म्हणून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी काम पाहिले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, उदयसिह पाटील, मयुरसिह पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उपसभापती संजय देहाडे, मंगेश पाटील, मोहन दुधाळ, देवराज जाधव, कैलास कदम, पंचायत समितीचे सर्व सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा