हिंदुत्व थाळ्या, घंटा बडवण्यापुरते किंवा दाढी-मिशा पर्यंत मर्यादित नाही: शिवसेना

13

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०: ‘हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी आहे. जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विकृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले आहेत. पण, सरसंघचालकांनी नागपुरातील विजयादशमी मेळाव्यात त्या ठेकेदारांचे दात घशात घातले आहेत,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. तसेच “भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत आणि छाती पिटत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत,” असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेचा आणि आरएसएसचा दसरा मिळाव्यावर दोन्ही पक्षप्रमुखांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं नागपुरात झालेल्या आरएसएसच्या व मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातील भाषणांचं विश्लेषण ‘सामना’च्या अग्रलेखातून आज करण्यात आलं आहे. हे विश्लेषण करताना शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा घणाघाती हल्ला चढवला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत.

‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात आणि खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळयास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे भागवत कधीच सांगणार नाहीत, असेही सामनातून म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे