पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु होणार, वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२०: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन बंद आहे. मुंबई लोकल बंद असल्यामुळं प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण, लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सामान्य नागरिकांसाठी अद्याप लोकल सुरू करण्यात आली नव्हती. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रवाशांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकल सुरु होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

एका प्रवाशानं ट्विट करत, “याआधी महिलांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे” अशी खंत व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार यांचं उत्तर

प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलं की, ‘पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.’ याआधी विजय वडेट्टीवार यांनी महानगर प्रदेशातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा