मुंबई, २९ ऑक्टोबर २०२०: लॉकडाउनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईमधील लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. सरकारकडून यासंबंधी रेल्वेला पत्र पाठवण्यात आलं आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नसून रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.
लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळेतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर रात्री आठनंतर शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्य प्रवासी लोकलने जाऊ शकतील, असे सरकारचे नियोजन आहे.
ठाकरे सरकारने प्रवासाच्या वेळांचा प्रस्ताव मांडताना प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर या प्रस्तावावर उत्तर देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
वडेट्टीवर यांचे संकेत
“आम्ही येत्या काही दिवसांत लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेऊ. याबाबत आमची चर्चा सुरु आहे. आम्ही लवकरच मुंबईकरांना दिलासा देऊ”, असं उत्तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी ट्विटरवर एका युझरला दिलं होतं. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास मुंबईकरांची लाईफलाईन रुळावर येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे