‘या’ बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०२०: कोरोनाव्हायरस येण्यापूर्वीच रियल ईस्टेट मध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर कोरोनाव्हायरस आल्यामुळं सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी लोकांनी घर घेण्याकडं कानाडोळा केला. त्यामुळं रिअल इस्टेट व्यवसाय आणखीनच मोडकळीला आला. दरम्यानच्या काळात आरबीआयने व्याजदरात बऱ्याच वेळा कपात देखील केली. यानंतर अनेक बँकांनी गृह कर्जावरील व्याजा मध्येदेखील कपात करण्यास सुरुवात केली. लोकांना घर घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी व्याजात कपात केली जात आहे. यालाच अनुसरून आता युनियन बँकेनं देखील आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या विविध प्रकारांचे व्याजदर कमी केले आहेत. युनियन बँकेने म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गृहकर्जाची प्रक्रिया शुल्कही कमी केले आहे. गृहकर्ज घेतल्यास १० हजार रुपयांपर्यंत सवलतही बँकेने देऊ केली आहे. ३० लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्ज घेतलेल्यांच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचं बँकेनं रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

यासह महिला अर्जदारांना अशा कर्जावरील व्याजदरामध्ये ०.०५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. अशा प्रकारे महिला अर्जदारांचं व्याज ०.१५ टक्क्यांनी स्वस्त असंल. याशिवाय वाहन आणि शैक्षणिक कर्जावरील प्रक्रिया शुल्कही काढलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेनं ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गृहकर्जाची प्रक्रिया शुल्कही कमी केल्याचं म्हटलं आहे. युनियन बँक म्हणाली, “सणासुदीचा हंगाम पाहता, किरकोळ आणि एमएसएमई सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून अनेक वित्त पुरवठा मोहिमा सुरू केल्या आहेत.” बँकेनं अशी आशा व्यक्त केली आहे की, कर्जदार बँकेने दिलेल्या कमी व्याजदराचा फायदा घेतील आणि कर्ज घेतील.

यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनीही गृह कर्जाचे दर कमी केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा