मुंबई, ६ नोव्हेंबर २०२०: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी साजरी केली जाईल. कोरोनाचं संकट पाहता राज्य सरकारने काही सूचना जारी केल्या आहे. फटाके फोडण्याबाबत सरकारने बंदी घातली नाही परंतु खबरदारी म्हणून काही सूचना दिल्या आहेत. गृह विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करुन नागरिकांना यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील, असं राज्य सरकारकडून सूचित करण्यात आलं.
या आहेत मार्गदर्शक सूचना
– कोरोना संदर्भात असलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे.
– दिवाळीत प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके फोडणे टाळावे. दिव्यांची आरास करा आणि दिवाळी साजरी करा.
– दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन न करता ऑनलाइनवर भर द्यावा. सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे
– सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्था यांनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिरांवर भर द्यावा.
– धार्मिक स्थळं अद्याप खुली केलेली नाही. त्यामुळे सण घरगुती पद्धतीने साजरा करावा
मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध
दरम्यान, मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध घातले आहे. फटाके फोडण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची एसओपी जारी होणार आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मर्यादित स्वरुपात आणि मर्यादित स्वरुपातच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे