बिडेन विजयाच्या अगदी जवळ, ट्रम्प यांनी दिले हार मानण्याचे संकेत

वॉशिंग्टन, ७ नोव्हेंबर २०२०: डेमोक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांच्या सोबतच्या सामन्यात सतत पिछाडीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार मानण्याचे संकेत दिले आहेत. केवळ वैध मते मोजली गेली असती तर त्यांनी निवडणूक सहज जिंकली असती असा दावा त्यांनी केला. व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयातच निश्चित होईल.

बिडेन विजयाच्या जवळ

दुसरीकडं, जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया येथे चुरशीच्या लढाईत आघाडी घेतल्यानंतर बिडेन विजयाच्या जवळ आले आहेत. अ‍ॅरिझोनामध्येही ट्रम्प पिछाडीवर आहेत. बिडेन नेवादामध्ये आधीपासूनच आघाडीवर आहेत. दरम्यान, काही राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेबाबत कोर्टात गेलेल्या ट्रम्प कॅम्पला मिशिगन आणि जॉर्जियामध्ये निराशेचा सामना करावा लागला आहे. पेनसिल्व्हेनिया आणि नेवाडा येथे ट्रम्प कॅम्पच्या वतीनं कायदेशीर खटले देखील दाखल केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतदानाची मागणी केली गेली आहे.

ट्रम्प कम्पेन’चा चुकीच्या मतगणनाचा आरोप

अमेरिकन कोर्टानं ट्रम्प यांच्या मिशिगन आणि जॉर्जियामधील निवडणूक घोटाळ्याशी संबंधित खटला फेटाळून लावला आहे. मिशिगनमधील ट्रम्प कम्पेनच्या वतीनं गैरहजर मतपत्रिकांची मतमोजणी थांबविण्याचा प्रयत्न केला गेला, तर जॉर्जियात असंही म्हटलं गेलं की तिथं अनुचित मतपत्रिका देखील मोजल्या जात आहेत. मात्र, मिशिगन कोर्ट ऑफ क्लेम्सच्या न्यायाधीश सिन्थिया स्टीफन्स यांनी गुरुवारी हा खटला फेटाळून लावला.

जॉर्जिया कोर्टानेही हे प्रकरण फेटाळून लावलं

मिशिगन कोर्ट ऑफ क्लेम्सनं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, मिशिगनचे राज्य सचिव मतमोजणी प्रक्रियेत सामील नाहीत. यासंदर्भात औपचारिक आदेश नंतर देण्यात येईल. मिशिगन येथील जो बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. दुसरीकडं, जॉर्जियातील न्यायाधीश जेम्स एफ. बास यांनी ट्रम्प कम्पेनच्या वतीनं दाखल केलेला खटला फेटाळून लावला. बास म्हणाले, “मी विनंती नाकारली आहे आणि याचिका देखील फेटाळून लावली आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा