सध्या एनडीए आघाडीवर, परंतु चित्र कोणत्याही क्षणी बदलण्याची शक्यता

पाटणा, १० नोव्हेंबर २०२०: आजचा दिवस बिहारसाठी खूप महत्वाचा आहे. मंगळवारी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामुळं येथील नवीन सरकारची दिशा निश्चित होईल. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडी या दोघांपैकी कोणाच्या डोक्यावर जनता विजयाचा मुकुट ठेवल ते आज स्पष्ट होईल. २४३ विधानसभेच्या जागांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. दरम्यान सध्यातरी एनडीए आघाडीवर दिसत आहे.

सध्या एनडीए आघाडीवर दिसत असल्याच चित्र असलं तरी असं म्हटलं जात आहे की कोणत्याही क्षणी हे चित्र बदलू शकतं. याचं कारण असं आहे की, आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या ४० जागांवर उमेदवारांमध्ये केवळ १००० मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक ५०० मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळं पुढच्या काही तासांमध्ये महागठबंधन पुन्हा आघाडीवर येईल, असा दावा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीला सुरुवात होताच महागठबंधन आघाडीवर दिसत होते. मात्र नंतरच्या काळात हे चित्र पुन्हा बदलताना दिसलं. नंतरच्या काळात एनडीए’नं आघाडी घेत १२० पुढं धाव घेतली. सध्या एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास १२७ तर महागठबंधन १०४ जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया श्रीनेत यांनी ‘आज’तक’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतक्या लवकर निवडणुकीच्या निकालावर भाष्य करणं चुकीचं ठरंल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

तर दुसरीकडे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवासन यांनीही निकाल येण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा अवधी लागंल, असं स्पष्ट केलं. बिहारमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्के मतांची मोजणी झाली आहे. अजूनही ३ कोटी १० लाख मतांची मोजणी बाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा