मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : मनरेगा, अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागात १ लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते आणि इतर खडीकरणाचे रस्ते बांधण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही माहिती दिली. याद्वारे गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल, शेतकरी स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कामांबरोबरच मृद आणि जलसंधारण, गाळमुक्त धरणांची कामं, घरोघरी शोषखड्डे आणि घरकुल बांधणं इत्यादी कामंही या योजनेंतर्गत केली जाणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेनं या योजनेंतर्गत गाई म्हशींसाठी गोठे बांधणं, कुक्कुटपालन शेड बांधणं असे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांनी या योजनेंतर्गत पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करुन ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदांना दिल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी