वायसीएम रुग्णालयात तब्बल अकरा नवजात अर्भकांनी कोरोना विरूद्धची लढाई जिंकली

9

पिंपरी -चिंचवड, ११ नोव्हेंबर २०२० : कोरोना संसर्गाचा अधिक धोका वृद्धां प्रमाणेच बालकांना असतो मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कोवीड १९ समर्पित वायसीएम रुग्णालयात तब्बल अकरा नवजात अर्भकांनी कोरोना विरूद्धची लढाई जिंकली असून त्यांची प्रकृतीही उत्तम आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाल्यानं वायसीएम रुग्णालय कोवीड १९ समर्पित रुग्णालय करण्यात आलं. याबरोबरच कोरोनाग्रस्त महिलांसाठी वेगळा प्रसूती विभागही सुरू करण्यात आला. आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या २५५ गर्भवती महिलांची प्रसुती या विभागात सुखरूप झाली. त्यापैकी ११ नवजात बालकांना त्यांच्या आईपासून कोरोनाचे संक्रमण झालं होतं. ११ पैकी ९ बालकांमध्ये सौम्य लक्षणं असल्यानं त्यांच्यावर ३ दिवस अतिदक्षता विभागात उपचार केले गेले. तर उर्वरित २ बालकांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं होती. त्यांना मात्र १४ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले.

आता सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली. या २५५ महिलपैकी १६३ महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर गुंतागुंतीचे आजार होते. पण आईकडून कोरोनाची बाधा झालेल्या अकरा अर्भकाच्या मातांना मात्र कुठलेच जटिल आजार नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी