हरियाणा, १३ नोव्हेंबर २०२०: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका दलित मुलीशी झालेला युवकाचा प्रेमविवाह त्याच्या जीवावर आला आहे. वास्तविक या प्रेमविवाहामुळं मुलीच्या गावात संताप व्यक्त झाला होता. तिथल्या दलित तरुणांनी आपल्या गावात येताच मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. असं असूनही, तो तरुण ८ नोव्हेंबरला सासरच्या घरी पोहोचला. जिथं अर्धा डझन दलित तरुणांनी काठ्यांनी त्याला जोरदार मारहाण केली. तरूणाला गंभीर अावस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आलं. जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हत्येचं हे प्रकरण गुरुग्राममधील बादशाहपूर गावातील आहे. वास्तविक, एका खासगी कंपनीत काम करणार्या आकाश या युवकाचे बादशाहपूर येथील दलित मुलीशी ५ महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध होते. या प्रकरणी मुलीच्या समाजातील काही लोक संतप्त झाले. यामुळं गावातील दलित तरुणांनी आकाशला धमकावलं होतं की त्यानं त्यांच्या गावात पाऊल ठेवलं तर ते त्याला ठार मारतील.
लग्नाच्या पाच महिन्यांनंतर अचानक ८ नोव्हेंबरला आकाश आपल्या सासरी बादशाहपूर गावात पोहोचला. तेवढ्यातच पाच दलित तरुणांनी त्याला घेरलं आणि काठ्यांनी जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून त्याला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
१० नोव्हेंबरला आकाशचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी सुरू होती. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना ओळखलं. यानंतर पोलिसांनी कारवाई करून पाच आरोपींना अटक केली. हे पाचही आरोपी बादशाहपूरचे आहेत.
आकाशच्या हत्येप्रकरणी बादशाहपूर येथील पवन, मोहित, इंद्रजित अजय, लालू उर्फ धमेंद्र आणि रवी यांना अटक करण्यात आली असल्याचं एसीपी प्रीतपाल सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे