जम्मू काश्मीर, १३ नोव्हेंबर २०२०: भारतीय लष्करानं केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय उत्तर काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
या चकमकी दरम्यान सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाल्याची माहिती हाती आली आहे. तसेच लष्करातील एक जवान देखील जखमी झाला आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबल वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
“कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यानं सर्वोच्च बलिदान दिलं आहे. अधिकारी मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होते,” अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे. दरम्यान अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून बीएसएफ त्यांना योग्य उत्तर देत असल्याची माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे