एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला… लव्ह जिहाद वरून शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२०: सध्या भाजप कडून देशभरात लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करावा अशी मागणी होत आहे. याच पार्शभुमिवर भाजप नेत्यांकडून सातत्यानं ठाकरे सरकारकडं ‘लव्ह जिहाद‘ बाबत कायदा करण्याची मागणी करत आहे. तसंच लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारनं कोणतीही भूमिका घेतली नसल्यानं भाजपचे पुढारी शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेनं आपल्या मुख पत्रातून प्रतिउत्तर दिलंय. आपल्या अग्रलेखातून राऊत यांनी म्हटलं की, आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशानं स्वीकारली असं होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असंल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील.

एक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद’ झाला…

अग्रलेखात राऊत पुढं म्हणाले की, एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आलं व टिकलं. ते टिकणारच आहे!

पाकिस्तान, चीनची घुसखोरी, रोज होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे दुसरया महायुद्धाप्रमाणे उसळलेले संकट, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट हे प्रश्न तसे गंभीर नसून ‘लव्ह जिहाद’ हेच देशासमोरचं सगळयात भयंकर संकट आहे व महाराष्ट्र सरकारनंही इतर राज्यांप्रमाणं ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप पुढाऱ्यांनी केली आहे.

लव्ह जिहाद हे भाजपचं नवीन हत्यार

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मा यांनी मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. त्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त करावी हे अनाकलनीय आहे. भाजपनौ ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर आणावं, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचं नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर पाकिस्तान आणि बांगलादेशात. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणं जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा