नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२०: मोदी सरकारनं चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारताच्या संरक्षण, सुरक्षा आणि सार्वभौमतेसाठी धोका असल्याचं सांगत मोदी सरकारनं ४३ मोबाइल अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं अलिबाबा वर्कबेंच, अली पे कॅशियर, डिलिव्हरी अॅप लालमूव इंडिया, स्नॅक व्हिडिओ अशा अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
बंदी घातलेल्या अॅप्सपैकी काही जुने अॅप्स देखील आहेत, परंतु बरेच अॅप्स असे आहेत की जे सहायक अॅप म्हणून कार्य करतात. अलीबाबाच्या काही अॅप्सवर यापूर्वी बंदी देखील घातली गेली होती, पण यावेळी अली बाबाच्या काही सपोर्टिंग अॅप्सवर बंदी घालण्यात आलीय. यामध्ये अलीस्प्लीयर्स, अलीएक्सप्रेस आणि अलीपे कॅशियर सारख्या अॅप्सचा समावेश आहे.
या अॅप्समधील बरेच अॅप्स कमी लोकप्रिय आहेत आणि गुगलही अशा अॅप्स त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकतं. यापैकी बरेच अॅप्स अद्याप स्टोअरमध्ये दिसत आहेत. या क्षणी हे स्पष्ट झालं नाही की बंदी घातलेली ही अॅप्स पूर्णपणे ब्लॉक केली जात आहेत की त्यांना प्ले स्टोअरमधून काढलं जात आहे.
अलिबाबा ग्रुपची काही प्रमुख अॅप्स, शॉर्ट व्हिडिओ शेअरींग अॅप स्नॅक व्हिडिओ, बिझिनेस कार्ड रीडर अॅप कॅम कार्ड, ट्रक आणि ड्रायव्हर अॅग्रीगेटर लालमूव इत्यादी काही प्रमुख अॅप्स या वेळी अवरोधित आहेत.
यापूर्वी २९ जून २०२० रोजी भारत सरकारनं ५९ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती आणि २ सप्टेंबर २०२० रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत ११८ अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारच्या वतीनं ही कारवाई करतांना असं म्हटले गेले की, नागरिकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आणि सर्व मोर्चांवर भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावलं उचलतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे