पिंपळनेर येथील डिसीसी बँकेचे कुलूप तोडून ४२ हजारांची चोरी    

6

सोलापूर (माढा), ८ डिसेंबर २०२०: माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील सोलापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ४२ हजारांचे संगणकीय साहित्य चोरून नेलं असल्याची फिर्याद शाखाधिकारी नवनाथ जनार्दन दगडे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळनेर ता. माढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या बँकेचं कामकाज उरकून शनिवारी सायंकाळी घरी गेले होते. दरम्यान सोमवारी सकाळी निमगांव (टें) शाखेच्या शिपायानं फिर्यादी पिंपळनेर बँकेच्या शाखाधिकारी दगडे यांना फोन करुन तुमच्या बँकेच्या ग्रीलचा व लाकडी दरवाजा उघडा असून ग्रीलचं कुलुप कापलेलं दिसत असल्याची माहिती दिली.

फिर्यादी शाखाधिकारी दगडे यांनी येऊन पाहिलं असता बँकेतील काऊंटरवरील संगणक साहित्य चोरीला गेलं असल्याचं लक्षात आलं. यामध्ये ४ माॅनिटर एकूण किंमत १२ हजार रुपये, १२ हजार रुपये किंमतीचे ४ सीपीयु, ५ हजार रुपये किमतीचा प्रिंटर, ४ हजार युपीस इनव्हर्टर, ९ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या असा एकूण ४२ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील