बारामती, १४ डिसेंबर २०२०: बारामती येथील प्रगती नगर चिंचकर इस्टेट येथून दि. ७ तारखेला चारचाकी गाडी चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. या प्रकरणी प्रगती नगर, चिंचकर इस्टेट येथे राहणारे डॉक्टर रामदास तात्यासो मोरे यांच्या मालकीची अमेज होंडा कंपनीची चार चाकी गाडी रात्रीतुन चोरीस गेली होती.
डॉ. रामदास मोरे यांनी दि. ७ रोजी पार्किंग मध्ये गाडी लावली होती मात्र सकाळी उठल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, चार चाकी गाडी (एम एच-२ए एक्स ६२६ ) ही अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ही चारचाकी गाडी इंदापुर तालुक्यातील लाकडी रोडनं बारामतीच्या दिशेनं येत आहे.
यावर गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, बारामती पोलिसांनी लाकडी रोडवर पेट्रोलिंग व नाकाबंदी करत गाडी आरोपीसह ताब्यात घेण्यात आली. या गुन्ह्यात ८५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मंगेश गौतम भागवत वय २८ रा. कळस, तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जगताप करत आहेत.
नागरिकांनीही सतर्क राहावं
सध्या शहरात दुचाकी, चार चाकी वाहनांच्या चोरीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सामान्य माणूस आपल्या दैनंदिन आर्थिक पुंजीतून प्रसंगी बँकांचं कर्ज काढून वाहन खरेदी करत असतो. अशातच जर आपलं वाहन चोरीला गेलं तर सामान्य माणसाला नाहक आर्थिक भुर्दड बसतो. त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी स्वतः खबरदारी घ्यावी, लोखंडी साखळी लाऊन गाडी लॉक करण्याचाही प्रयत्न करावा म्हणजे काही अंशी चोरीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव