मुंबई: राज्यात निवडणुकांचे निकाल लागून जवळपास २०हुन अधिक दिवस उलटून गेले. तरीही राज्यात कुठलंही स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दुसरीकडे मात्र मुंबईत भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना संबोधित करताना म्हणाले की, भाजपाशिवाय राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही. अशी माहिती यावेळी सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई येथे गुरुवारी (दि. १४) रोजी ही बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली.फडणवीस पुढे म्हणाले की, भाजपाच्या सहभागाचा फायदा मित्रपक्षांना झाला आहे. त्यामुळेच त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्याही अनेक मतदारसंघात प्रचार केला. परंतु शिवसेनेचा कोणताही नेता भाजपा उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, असेही सांगितले. भाजपा वगळता राज्यात कोणाचंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.