पुणे, २७ डिसेंबर २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्या कारणाने, कामधंद्यांसोबत विद्यालय देखील बंद होती. काही कालांतराने विद्यालय महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात आले मात्र काही विद्यार्थी आर्थिक, वैयक्तिक अडचणी मुळे ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहिले. तर, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘परिषद की पाठशाला’ असा उपक्रम राबविला आहे.
विविध भागातील, वस्तीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एका ठिकाणी बोलवून दर रविवारी परिषद की पाठशाला भरवून इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रम, खेळ राबवून त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे.
आज रविवार दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डेक्कन नगर पुणे येथील कार्यकर्त्यांनी मिळून गोखले नगर येथील परिसरातील विविध घरांत संवाद साधून मुलांना बोलावून डेक्कन नगरातील पहिली परिषद की पाठशाला भरवली. तसेच विद्यार्थ्यांना परिषदेकडून खिचडी देखील वाटप करण्यात आली.
यावेळी पुणे महानगर सहमंत्री दयानंद शिंदे, राष्ट्रीय कलामंच महाराष्ट्र प्रांत प्रमुख प्रसाद जाधव, स्टुडंट्स फॉर सेवा प्रमुख योगिता शिंदे, डेक्कन नगर कलामंच प्रमुख ऋतुराज तारकर, कोथरूड भाग कार्यालय मंत्री सोहम दुरूगकर,गणेशखिंड नगर सहमंत्री शिवम मेंडजोगी, प्रगती कराड, हर्षदा निगडे, रितेश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड