चोरट्यांना पाहून पोलिसांनी काढला पळ, औंध मधील घटना

औंध, २९ डिसेंबर २०२०: पोलिसांसमोर चोरट्यांनी चोरी करून धूम ठोकली. मात्र, पोलीस केवळ बघत राहिले. हा प्रकार पुण्यातील औंध येथील सिद्धार्थनगर भागात असलेल्या शैलेश टॉवर सोसायटीमध्ये झाला आहे. २८ तारखेला पहाटे साडेतीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे चोरट्यांना पाहून दोन पोलिसांपैकी एक आपल्या सहकाऱ्याला तेथेच सोडून निघून गेला.

घडलेली घटना अशी की, २८ डिसेंबर रोजी औंध येथील शैलेश टॉवर मध्ये चार चोरटे घुसले. सोसायटीमधील पाच फ्लॅटचे लॉक तोडून चोरट्यांनी चोरी देखील केली. दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास ही घटना आली. यानंतर या व्यक्तीने तातडीने पोलिसांना फोन लावला. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले सुद्धा. मात्र, आरोपी चार आहेत आणि आपण दोघं आहोत हे पाहून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर त्यातील एक पोलिस कर्मचारी गाडीवरून निघून जात असतानाचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.

घडलेल्या या प्रकारानंतर संबंधित नागरिकांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षकांना त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील सुपूर्त केली. पोलिसांच्या या वागणुकीमुळे याबाबत वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस प्रशासनाकडून असे आश्वासन देखील देण्यात आले आहे की जर हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दोषी आढळले तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा