इंदापूर, २९ डिसेंबर २०२०: इंडियन इंदापूर तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेले न्हावी गाव नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. अशीच एक घटना गावातील गरीब कुटुंबातील शोभा संतोष अवघडे यांच्या सोबत घडली. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या शोभा यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. घरची हालाखीची परिस्थिती असल्याने यावर होणारा मोठा खर्च आवाक्याबाहेरचा होता. परंतु नावी गावातील युवकांनी याबाबत पुढाकार घेऊन आर्थिक मदतीसह मानसिक धीर देत शोभा यांना सुखरूप घरी आणले.
एकंदरीतच कर्करोगावर उपचार घेत असताना रक्ताचा तुटवडा भासल्याने गावातील युवकांनी रक्तदान शिबिर आयोजित करून त्या माध्यमातून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध करून दिला. तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य देखील अवघडे यांना केले. सांगली येथे कर्करोगावर उपचार सुरू असतानाच क्रूर नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांना कोरोनाची देखील लागण झाली. तेथून त्यांना इंदापूर येथील राऊत हॉस्पिटल मध्ये कोरोना वरती उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.
राऊत हॉस्पिटल मध्ये डॉ. बाळासाहेब राऊत यांनी आठवड्याचे प्रयत्न करून त्यांना कोरोना मुक्त केले. त्यानंतर अवघडे यांना कर्करोगावरील पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.अनेक महिन्यांपासून सुरू असलेली ही दुहेरी झुंज अखेर यशस्वी झाली. या उपचारादरम्यान त्यांना डॉ. बाळासाहेब राऊत, डॉ. स्वप्नील कसबे, डॉ. राधा धोटे आणि सर्व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह गावातील युवक तुषार भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आटोक्याचे प्रयत्न केले.
दुहेरी आजारातून आपण सुखरूप घरी परतण्याचा आनंद अवघडे यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. त्यांनी त्यांच्यासाठी झटणाऱ्या सर्व डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि गावातील युवकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे