सिडनी, १० जानेवारी २०२१: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा काही प्रेक्षकांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर वांशिक भाष्य केले आहे. सिराज बाउंड्री लाईन वर फील्डिंग करत होता. सिडनी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कडक सुरक्षा असूनही, सिराज वर पुन्हा गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, त्यानंतर सामना सुमारे १५ मिनिटे थांबला. सामन्यादरम्यान टीम इंडियाने पंचांकडे तक्रार केली, त्यानंतर सिडनी क्रिकेट मैदानावर बसलेल्या प्रेक्षकांच्या गटास सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्टेडियमबाहेर काढले, ज्यांनी सिराजवर वांशिक भाष्य केले होते.
सिडनी येथील क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या या वागण्याने भारतीय संघ व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी ब्रेक दरम्यान सुरक्षा अधिकार्यांशी या घटनेविषयी बरीच चर्चा केली. चौथ्या दिवशी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही पंचांशी प्रेक्षकांच्या वागणुकीबाबत संवाद साधला, यामुळे सुमारे १५ मिनिटांचा खेळ थांबला. त्यानंतर पंचांनी स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचार्यांशी चर्चा केली.
सुरक्षा कर्मचारी प्रेक्षकांच्या स्टँडवर येऊन काही प्रेक्षकांशी बोलले आणि त्यांना स्टेडियमबाहेर काढले, त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. चौथ्या दिवशी ही घटना ८५ व्या षटकात घडली. सिडनी कसोटीच्या तिसर्या दिवशी मोहम्मद सिराजवर सतत भाष्य केले जात होते. मद्यपान केलेल्या काही प्रेक्षकांनी सिराजला शिवीगाळ केली. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघाने याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली होती.
टीम सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रेक्षकांच्या टिप्पण्या खूप अपमानास्पद होत्या. केवळ मोहम्मद सिराजच नाही तर संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशी देखील ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी गैरवर्तन केले. ऑस्ट्रेलियन प्रेक्षक अनेकदा ऑस्ट्रेलियात येणाऱ्या संघांवर दबाव आणण्यासाठी अशी कृत्य करत असतात, जेणेकरून यजमान संघ मैदानावर याचा फायदा घेऊ शकेल.
यापूर्वी शनिवारी भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्यांनी सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी भाष्य केल्याची तक्रार केली होती. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयसीसी, स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी बुमराह आणि सिराज यांच्याशी दीर्घ चर्चा केली आणि या वेळी भारतीय संघ व्यवस्थापनाचे सदस्यही त्यांच्यासोबत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे