बारामती व्यावसायिकाला खंडणीची मागणी

बारामती २० जानेवारी २०२१ : बारामती एमआयडीसी भागातील दोघा व्यावसायिकांकडे दरमहा ५ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या तिघांनी हाॅटेल मधील खुर्च्या, टेबल यांची मोडतोड करत आईसक्रिम चालकाच्या दुकानातील रोख रक्कम बळजबरी करत चोरून नेली. मंगळवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या प्रकरणी शुभम खराडे (पूर्ण नाव नाही, रा. शेटफळ गढे, ता. इंदापूर)त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिसांनी खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमनाथ रामचंद्र महानवर यांनी फिर्याद दिली आहे.रुईतील संदीप काॅर्नर येथे महानवर यांचे संदीप चायनीज हाॅटेल असुन त्यांच्या हाॅटेलशेजारी उगमालाल गोमाजी गाडरी हे संजीवनी आईसक्रिमचे दुकान चालवतात. मंगळवारी गाडरी हॉटेल मध्ये असताना त्यांच्या तोंडअोळखीचे शुभम खराडे व त्याचे दोन साथीदार हाॅटेल मध्ये आले. त्यांनी चायनीज पदार्थांची आर्डर दिली. पदार्थ खाऊन झाल्यावर त्यांना ४६० रुपये बिलाची फिर्यादीने मागणी केली. यावेळी खराडे यांनी अश्लिल शिविगाळ करत मला बिल मागतो, तुला जर हाॅटेल चालवायचे असेल तर मला दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर हाॅटेल बंद करावे लागेल अशी धमकी दिली.खराडे व त्याच्या दोन्ही साथीदारांनी हाॅटेल मधील खुर्च्या उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकून मारल्या. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला तसेच मनगटाला दुखापत झाली. हाॅटेलमधील स्टुलची आरोपींनी मोडतोड केली.त्यानंतर या तिघांनी बाजूच्या आईसक्रिम दुकानदार उगमालाल गाडरी यांना लाथा बुक्कांनी मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिश्यातील पाकिट तसेच आईसक्रिम दुकानाच्या गल्लातील पैसे अशी ४ हजार २०० रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली. या दोघांचा आरडाओरडा एेकून आजूबाजूचे सर्व दुकानदार, दुकानीतील ग्राहक, लोक जमा झाल्यावर शुभम खराडे याने त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस खोचलेला चाकू हातात घेवून आमच्या दिशेने उगारून, कोणी जर पुढे आला तर एकेकाचा मुडदा पाडेल अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व दुकानदार घाबरुन दुकान बंद करून पळून गेले.आरोपी तेथून दोन मोटार सायकलीवरून निघून गेल्यावर फिर्यादीने व लगतच्या दुकानदाराने पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा