तालुका पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

11

बारामती, ३० जानेवारी २०२१:  तालुका पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना दमदाटी करत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी समीर बापू चौधर (रा.रुई, बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार दिली. शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी तालुका पोलिस ठाण्याच्या बाहेर लोकांचा गोंधळ सुरु होता. त्यामुळे ठाणे अंमलदार ठोंबरे यांनी फिर्यादीला बाहेर जावून काय गोंधळ चालला आहे ते पहा, असे सांगितले. फिर्यादीने अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर जावून पाहिले असता वादावादी करणारे पळून गेले.

जमलेल्या लोकांकडे चौकशी केली असता चौधर हा येथे गोंधळ घालत असल्याचे समजले. त्यानुसार त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी मिळवत त्याला फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. काही वेळाने फोन उचलल्यानंतर पोलिसांनी बाहेर गोंधळ का घालत होता, तातडीने पोलिस ठाण्यात या,असा निरोप दिला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास चौधर पोलिस ठाण्यात आला व त्याने मला फोन कोणी केला होता, अशी विचारणा केली. फिर्यादीने मीच फोन केला होता, बाहेर गोंधळ का घालत होता. म्हणल्यावर आरोपीने तु मला विचारणारी कोण, असे म्हणत अंगावर धावून गेला.

फिर्यादीला ढकलून देत त्याने तुझी लायकी आहे का मला फोन करायची असे म्हणत तुला बघून घेतो अशी दमबाजी केली. फिर्यादीने ठाणे अंमलदार कक्षात जात ही माहिती दिली. त्यानंतर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा चौधर याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव