बारामती, १ फेब्रुवरी २०२१: क्रिकेटमध्ये महिलांनाही मोठी संधी आहे, युवतींनी करिअर करण्याच्या दृष्टीने क्रिकेट खेळायला हवे, ग्रामीण भागातील मुलींमध्येही चांगले क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे, त्यांनी क्रिकेटचा विचार करायला हवा, अशी अपेक्षा भारतीय ट्वेंटी २० क्रिकेट संघाची कप्तान व अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटील यांनी व्यक्त केली.
बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर धीरज जाधव क्रिकेट अकादमीच्या वतीने टेवंटी २० महिला प्रिमिअर लिग सुरु आहे. अनुजा पाटील या बारामतीच्या संघाकडून सध्या खेळत आहेत. अनुजा पाटील यांनी ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, श्रीलंका, चीन, थायलंड, दुबई, मलेशिया या ठिकाणी भारताचे नेतृत्व केले आहे किंवा त्या अष्टपैलू खेळाडू म्हणून टेंवटी- २० व एकदिवसीय सामन्यात खेळल्या आहेत.
पाटील म्हणाल्या, क्रिकेटमध्ये केवळ मैदानावर खेळणे इतपतच मर्यादीत काम नसते तर अंपायर, फिजिओथेरपिस्ट, निवेदक, स्कोअरर, मॅच रेफ्री या सह इतरही अनेक ठिकाणी कामाच्या संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील मुलींकडे उत्तम क्रीडाकौशल्य असून त्यांनी क्रिकेटमध्ये आपले करिअर करण्याचा जरुर प्रयत्न करावा. ध्येयनिश्चिती झाली व मेहनत करायची तयारी असेल तर काहीच अवघड नाही, असा कानमंत्रही त्यांनी मुलींना दिला.
दरम्यान या प्रिमिअर लिगमध्ये बारामतीचा महिलांचा संघ उपांत्यफेरीपर्यंत जाऊन पोहोचला असून अंतिम फेरीत तो आपले स्थान निश्चित करेल, असे संघाचे प्रमुख धीरज जाधव यांनी सांगितले. ४ फेब्रुवारी रोजी बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर दुपारी एक वाजता प्रिमिअर लिगचा अंतिम सामना होणार असून तो सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुला असेल.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव