मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आता भाजपनेसुद्धा आमचंच सरकार येईल,असा दावा केला आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमच्याकडे ११९ संख्याबळ असल्याचे सांगत आहेत. मात्र, राष्ट्रवाडीकडून भाजपला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे १५ते २०आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा गौप्यास्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या चर्चा करतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेची विचारधारा वेगळी असली तरी प्रगतीच्या मुद्यांवर आम्ही एकत्र येऊ. सध्यातरी काही सांगता येत नसलं तरी एकमत झाल्यावर निर्णय जाहीर केला जाईल असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
दिल्लीत होणाऱ्या बैठकीत वरिष्ठांकडून निर्णय होईल. तसेच भाजप त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं सांगत असेल तर त्यांनी अजुन दावा का केलेला नाही? त्यांनी दावा करावा आणि विश्वासमत ठराव मांडावा अंसही त्यांनी म्हटले आहे.