नागपूर, १५ फेब्रुवरी २०२१: नागपुरातील फेज २ मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या बाह्यभागातील ग्रामीण भाग जसे हिंगणा, कामठी, कन्हान, उमियाधाम हे नागपूर शहराला जोडले जातील. याच रितीने मेट्रो फेज तीनच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला सुद्धा सुरुवात झाली असून नाशिकला मंजूर झालेली निओ मेट्रो प्रमाणे नागपूर मध्ये सुद्धा फेज ३ ची मेट्रो ही अमरावती रोडला जोडेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी काल नागपूर येथे केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान ७०.९८ कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या १.१२ किमी लांबीच्या रेल्वे उडाण पुलाचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकाच्या सभागृहात आयोजित एका कार्यकमात पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यासोबतच केंद्रीय रस्ते निधीतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे ११४ कोटीच्या तरतूदीने रहाटे कॉलनी ते खापरी उडाणपूलापर्यंत ५ .६ किमीची ‘व्हाईट टॉपिंग’ ची सुधारणा, २७ कोटी रुपये तरतुदीने खापरी रेल्वे उड्डाण पूल ते मनीषनगर लेवल क्रॉसिंग पर्यंत ३.१० किमीचे क्रॉक्रीट रोड आणि २४ कोटी रुपये तरतुदीचे शुक्रवार तलाव ते अशोक चौक या १ किमी लांबीच्या सिंमेट क्रॉक्रिट रस्ते बांधकामाच्या भूमीपूजनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी दक्षिण पश्चिम नागपूर चे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे