म्यानमार, १५ मार्च २०२१: म्यानमार मध्ये सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रविवारी यंगून भागातील आंदोलनकर्त्यांनी एका चिनी कारखान्याला आग लावली. ज्यानंतर म्यानमार सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला ज्यामध्ये ५१ नागरिक मारले गेले असल्याचे सांगितले जात आहे. मागील सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत सैन्याने केलेली ही सर्वात घातक कारवाई आहे.
यंगून भागात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला तर देशातील इतर वेगवेगळ्या ठिकाणांवरील १२ लोकांना देखील आपला जीव गमवावा लागला. म्यानमार मधील एका संघटनेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुरू असलेल्या संघर्षात म्यानमार मधील १२५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण म्यानमारमधील अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे मृतदेह पडून आहे परंतु, त्यांची गणना अद्याप केली गेलेली नाही.
म्यानमार मध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील अनेक देश चिंता व्यक्त करत आहे. युके ने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर संयुक्त राष्ट्राने देखील यावर चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, म्यानमार सैन्याने सुरू असलेला संघर्ष थांबवत निवडून आलेल्या सरकारच्या हाती सत्ता पुन्हा सोपवावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे