मुंबई, १९ मार्च २०२१: देशभरात वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की कोविड -१९ चाचण्यांची संख्या २३ ने कोटी ओलांडली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की भारत जलद लसीकरण करीत असून लवकरच लसींची संख्या ४० दशलक्षांपर्यंत पोहोचेल. गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत लोकांना ३ कोटी, ७१ लाख, ४३ हजार, २५५ डोस देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दररोजच्या सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. एकूण प्रकरणांपैकी ७९.५४ टक्के प्रकरणे या पाच राज्यांमधून येत आहेत. मंत्रालयाने सांगितले की, २४ तासांत ३५,८७१ नवीन प्रकरणे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या पाच राज्यांव्यतिरिक्त मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्येही प्रकरणे वाढत आहेत.
राज्यात एका दिवसात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
गुरुवारी, महाराष्ट्रात एका दिवसात एकूण २५,८३३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि १९ लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ८,१३,२११ लोक क्वारंटाईन ठेवलेले आहेत आणि ७,०७९ लोकांना संस्थात्मक अलग ठेवण्यात आले आहे. राज्यात एकूण १,६६,३५३ सक्रिय प्रकरणे आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये एकाच दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक २४,८८६ रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी नोंदवलेल्या घटनांनी हा आकडा ओलांडला आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर हे हॉटस्पॉट केंद्र आहेत. त्याशिवाय राज्यातील ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला आणि नंदुरबारमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.
नांदेडमध्ये आतापर्यंत एकूण २७,६३९ प्रकरणे समोर आली आहेत. सध्या येथे ४०५९ प्रकरणे आहेत. वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सर्व हॉटेल, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाईची दुकाने, जिम आणि पार्क्स वगैरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या उत्तर भागातील नंदुरबार या जिल्ह्यातही कोरोना वेगाने पसरत आहे. आदिवासी लोकसंख्येसह या जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,४८७ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी १७९४ सध्या ऍक्टिव्ह आहेत. येथे संध्याकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक, धार्मिक आणि मेळाव्यावर बंदी आहे.
राज्यातील विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. येथे कोरोना ग्रामीण भागात पोहचला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, उस्मानाबाद आणि नागपूरमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे