पुणे, ११ एप्रिल २०२१: लशीच्या तुटवड्यावरून केंद्र-राज्य सरकारमधील संघर्षाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, पुणे जिल्ह्यातील शंभर लसीकरण केंद्रे लशींअभावी शुक्रवारी बंद होती. लसीकरणासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले. पिंपरी-चिंचवडमधील सर्व केंद्रांवरील लशींचा साठा संपल्याने शुक्रवारी पिंपरीत एकाही केंद्रावर लसीकरण केले जाणार नव्हते. मात्र शुक्रवारी तातडीने पुण्याला लस पुरवठा करण्यात आला.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल ट्विट करून पुण्याला सलग तीन दिवस लस पुरवठा होणार असल्याचे सांगितले. ‘पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचे शुक्रवारी १ लाख डोस प्राप्त झाल्यानंतर आज शनिवारी पुन्हा १ लाख १० हजार डोस प्राप्त झाले आहेत. शिवाय उद्या रविवारीही १ लाख २० हजार कोरोना डोस प्राप्त होणार आहेत. यामुळे जिल्ह्यासह पुणे शहरात कोरोना लसीकरणाला गती येणार आहे.’ असे ट्विट त्यांनी केले.
मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला त्या वेळी त्यांनी असे सांगितले की, पुण्याला शुक्रवारी २.२८ लस मिळणार होत्या. मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी रात्री केवळ १ लाख लस उपलब्ध झाल्या. तसेच काल दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्याला १ लाख २०,००० लस मिळणार होत्या. तसेच आज देखील (११ तारीख) पुण्याला लस उपलब्ध होणार आहे. याबाबत आयुक्तां सोबत आपली चर्चा झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. परंतु येणारा हा पुरवठा पुण्यातील वाढते संक्रमण पाहता कमी पडणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे