अमानवतेच्या रोगावर मानवतेची लस शोधणारा महामानव

आज १४ एप्रिल २०२१ महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती संपूर्ण जगभरात साजरी होत आहे.आणि याच दिन विशेष भागात आज आपण या “धगधगणारा क्रांतीसूर्य” डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा काही भाग वाचणार आहोत.
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.
शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशीझाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्तोत्रे व भूपाळ्याही म्हणत.
सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी भाषा उत्तमरीत्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नॉर्मल स्कूल’मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.रामजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला.
 प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्षे राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात सुभेदारपदाचीही बढती मिळाली.रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.
बालपण
रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते.
भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणिमहाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. (‘आंबडवे’ या गावचा ‘अंबावडे’ असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.
अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षरओळख करून द्यावी लागली. इ.स. १९९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले.
यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले.
साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.
कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी करशब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव “सकपाळ” असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातीलगव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये “आंबडवेकर” असे आडनाव नोंदवले.
साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे ‘आंबेडकर’ असे झाले.नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.
सुरुवातीचे शिक्षण
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईलाआले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले. मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला.
शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे “शिपाई नाही, तर पाणी नाही” असे वर्णन केले आहे.
शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकरगुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्याशिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.
आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानातनेकरीसाठी रूजू झाले.
उच्च शिक्षण
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात देशाला प्रगत करण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी अनेक कार्य केले……
जातिसंस्था विषयक सिद्धान्त,अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा,साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष,’मूकनायक’ पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा,अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग,बहिष्कृत हितकारिणी सभा,कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट
चवदार तळे आंदोलन,धर्मांतराची घोषणा,’हरिजन’ शब्दाला विरोध,मंदिर सत्याग्रह,कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य,गोलमेज परिषदांमधील सहभाग,पुणे करार,राजकीय कारकीर्द,शैक्षणिक कार्य,स्त्रियांसाठी कार्य,धर्मांतराची घोषणा,धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा,अर्थशास्त्रीय कार्य,हिंदू कोड बिल,भारतीय स्वातंत्र्याविषयी विचार,काश्मीर समस्येवरील विचार,भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संविधानाची निर्मिती,बुद्ध जयंतीचे प्रणेते,
शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग…….
३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंतीउत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारत च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखीआंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.
दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७ च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, “हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल.”
मनुस्मृतीचे दहन…….
“ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.
समाज समता संघ…….
४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले.
 पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.
या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरु होते. सभेचे ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून ‘बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस’ मधून छापण्यात येई.
बौद्ध धम्मात धर्मांतर……
मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले. त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.
आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की – अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, “जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?”
 डॉ.बाबासाहेबांनी १३ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामानेआंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.
परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करुन त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.
बाबासाहब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार…
आकाश पाताल एक करो बुद्ध धम्म का स्वीकार करो…
अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणीयांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
 आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.
मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती. लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारव्यावर बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हणले जाऊ लागले.महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कौटुंबिक जीवन…….
आंबेडकर आपली पत्नी रमाबाईंना प्रेमाने “रामू” म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असत व त्यांची आलेली पत्रे वाचीत असत.रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाबाई यांचे निधन झाले. १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीचीऔषधे घेत होते.यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली.
कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या. डॉ. कबीर यांनी आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी बाबासाहेबांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.विवाहानंतर शारदा कबीरांनी ‘सविता’ हे नाव स्वीकारले. लग्नानंतरही पूर्वीच्या शारदा नावावरुन बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रेमाने शारू नावानेच हाक मारत असत.
सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने ‘माई’ किंवा ‘माईसाहेब’ म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.
महापरिनिर्वाण…..
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली.
दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले.
 त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले.
आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते.
७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले.
परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.
आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला ‘महापरिनिर्वाण स्थळ’ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे.
न्यूज अनकट तर्फे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन…….

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा