मुंबई, २२ एप्रिल २०२१: राज्यात कोव्हिड १९ प्रादुर्भावाची स्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिवसाला ६० हजारांच्या पुढे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. काल देखील असाच भयावह आकडा समोर आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वाढत चाललेला हा आकडा पाहून राज्यसरकारने आजपासून पुन्हा नवीन निर्देश जारी केले आहेत. तर दुसरीकडे राज्यात आरोग्य सेवांबाबत आपत्कालीन स्थिती देखील निर्माण होत चालली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ५६८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल ६७ हजार ४५८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज ५४ हजार ९८५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख २७ हजार ८२७ वर पोहोचला आहे. त्यातील ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१.१५ टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार ६८४ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज ६ हजार ७९० कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ८४ हजार ७४३ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ४८ दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्के इतका आहे. १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर १.४२ टक्के राहिलाय.
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुणे शहरात आज दिवसभरात ५ हजार ५२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ हजार ५३० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज दिवसभरात ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या ५१ हजार ९२० जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील १ हजार ३१४ जणांची प्रकृती गंभीर आहे. आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ८२ हजार ४९१ वर पोहोचली आहे. त्यातील ३ लाख २४ हजार २९७ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत ६ हजार २७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे